कसब्यात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पैशांचा वापर होऊनही जनतेनं…”
पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. १८व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना ९ हजार २०० मतांची आघाडी मिळाली असून आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. रवींद्र धंगेकरांनी तब्बल ११ हजार ४० मतांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह काँग्रेसने कसब्यातील भाजपाची २८ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे.
या दणदणीत विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. पैशांचा वापर होऊनही जनतेनं मतदानाच्या रुपाने मला आशीर्वाद दिला आहे. अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचा शुभेच्छांसाठी मला फोन आला. मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते अनुभवी नेते आहेत. भाजपाकडे हा शेवटचा आधार होता झिंगण्यासाठी. शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे, असे वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.