कसब्याची निवडणूक हे महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार आहे :  केशव उपाध्ये

Pune- हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या कसबा मतदारसंघात (Kasba Bypoll Election) शरद पवारांना (Sharad Pawar) अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घ्यायला लागतो, यातच काँग्रेसचा (Congress) पराभव आणि महाविकास आघाडीचे (MVA) विसर्जन नक्की झाले असल्याचे वक्तव्य भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले की भाजपा सरकारच्या कालावधीमध्ये पुणे शहराची विकास यात्रा वेगात चालू होती परंतु महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधी कोणतेही नवीन प्रकल्प आले नाहीत आणि चालू असलेले प्रकल्प रखडवले. कोरोना काळात मदत केली नाही. अडीच वर्षे सत्तेत असताना एसटी कामगार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत. सत्तेत असताना शरद पवार या प्रश्नांवर बोलले नाहीत. त्यांनी त्यावेळीच लक्ष घातले असते तर स्वप्निल लोणकर आणि अनेक एसटी कामगारांच्या आत्महत्या वाचल्या असत्या. सत्तेत असताना गप्प बसायचं आणि बाहेर असताना राजकारण खेळायचं हा यांचा जुनाच खेळ आहे. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा जो अनुशेष आहे तो एकनाथ शिंदे सरकार भरून काढत आहे. कसब्याने कायम विकासाला मतदान केले आहे आणि पुण्याला पुढे नेणारे हेच सरकार आहे याचीही कसब्यातील नागरिकांना पूर्ण जाणीव आहे त्यामुळे यावेळी कसब्याची निवडणूक हे महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार आहे.

काँग्रेसमध्ये फूट पडली आहे, उद्धव ठाकरे गट विरून गेला आहे, आणि शरद पवार कधीच काँग्रेसला मदत करत नाहीत त्यामुळे भाजपा चा विजय निश्चित आहे असेही त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला आ. माधुरीताई मिसाळ,  प्रदेशाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कुणाल टिळक, संजय मयेकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.