कसबा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर आमने-सामने

पुणे- मागच्या महिन्यात पार पडलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती. कसब्यात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (hemant Rasne) विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली होती. आता हे दोन्ही नेते निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांची खासदार गिरीष बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राच्या लोकार्पण सोहळ्यात भेट झाली आहे.

गिरीष बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. याच कार्यक्रमासाठी धंगेकर आणि रासने दोघेही एकत्र आल्याचं बघायला मिळालं. यावेळी दोघेही हसत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोघांनी मिळून भित्तीचित्राचं लोकार्पण केलं आणि एकमेकांसोबत हातही मिळवला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याने त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.