कसब्यात हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव! म्हणाले, “मी कुठेतरी कमी पडलो…”

आज सकाळीपासून कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. कसब्यात भाजपाच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात काँटे की टक्कर होईल असे वाटले होते. परंतु प्रत्येक फेरीअखेर बालेकिल्ला असलेल्या भाजपाची चिंता वाढत आहे. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या रवींद्र धंगेकरांनी अठराव्या फेरीअखेरही आघाडी कायम ठेवली आहे. अठराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांना ६७,९५३ मते मिळाली असून हेमंत रासने ५८,९०४ मतांवर आहेत.

आतापर्यंतचे आकडे पाहता धंगेकरांचा विजय निश्चित दिसत आहे. हे पाहता भाजपच्या हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. “कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रणा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती”, असे यावेळी हेमंत रासने यांनी म्हटले आहे.