राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भाजपाच्या हेमंत रासनेंवर कारवाई करण्याची मागणी, पण कारण काय?

Kasba Peth Bypoll Election : कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली. हेमंत रासने स्वत: उमेदवार असून त्यांनी भाजप पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून मतदान केंद्रात प्रवेश केल्याने रुपाली पाटील ठोंबरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते?, हे पाहावे लागेल.

रुपाली पाटील ठोंबरे यांचे पत्र जशास तसे..

महोदय,

आज दिनांक २६/२/२०२३ रोजी कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नू.म.वि. प्रशालेत असणाऱ्या बुथवर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी त्यांचे गळ्यात भाजप या पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून प्रवेश केला. सदरची घटना सर्व माध्यमांनी चित्रित केली असून या प्रकारामुळे हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. निवडणूक चिन्ह असलेली पट्टी घालून मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत हेमंत रासने स्वतः उमेदवार असतानाही त्यांनी मतदान केंद्रावर प्रवेश कसा केला व त्यांना त्या ठिकाणी बंदोबस्त वर असलेले पोलिसांनी तसेच निवडणूक कर्मचारी यांनी प्रतिबंध कसं केला नाही असा प्रश्न माझेसहित सामान्य मतदारांच्या मनात पडला आहे. म्हणून निवडणूक नियमावलीचे मतदाना दिवशी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उल्लंघन केले असल्याने या प्रकाराची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांची उमेदवारी रद्द करावी तसेच इतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी ही विनंती.