काश्मिर रक्तबंबाळ आहे आणि सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करता?, राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई – काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या (Target killing) माध्यमातून बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे.

काश्मीरमधील एका कुटुंबाचे अश्रू सुकण्यापूर्वीच आणखी एका हल्ल्याची बातमी येते. दहशतवादी उघडपणे लोकांना मारून दहशत पसरवत आहेत, पण केंद्रातील सरकारला याची कोणतीही चिंता नसल्याचे दिसत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आणखी किती निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतील? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली.  आठ वर्ष कसली साजरी करतायत? तिथे काश्मीर रोज हिंदूंच्या रक्तानं भिजून जातोय. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो काश्मिरी पंडित मुलाबाळांना घेऊन पलायन करत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार भाजपाचं आहे. तुम्ही ताजमहाल, ज्ञानवापी मशिदीच्या खालचं शिवलिंग शोधताय. भाजपाला टीका करायला काय जातंय. काश्मिरी पंडित मरतायत त्याकडे पाहा. त्यावर बोला. टीका कसली करताय? 1990 साली काश्मिरी पंडितांचं हत्याकांड झालं, पलायन झालं तेव्हाही भाजपाच केंद्रात सत्तेत होती. आजही भाजपाच सत्तेत आहे.