वादग्रस्त पोलिस भरती प्रक्रीया बंद ठेवा; कॉंग्रेसची मागणी 

पणजी : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने, वादग्रस्त पोलिस भरती प्रक्रीया बंद ठेवावी अशी मागणी कॉंग्रेसने मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी या संदर्भात मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

भाजप सरकारने नोकऱ्यांचा जो घोटाळा केला आहे, त्यातून पात्र उमेदवारांना नोकरी पासून वंचित ठेवले आहे आणि आपल्या नातेवाईकांना नोकऱ्या दिल्या आहे आणि विकल्याही आहेत असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. भाजपची पदाधिकाऱ्यांची मुले शारिरीक चाचणीत नपास होवूनही त्यांना नोकऱ्या कशा देण्यात आल्या आहेत असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

पोलिसांच्या नोकऱ्या विकण्याच्या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या पोलिस महासंचालकांना तातडीने दिल्लीत बदली करण्यात आली होती हे सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले.अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्याला रोखू नाही शकत आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस सदैव प्रयत्न करणार असे चोडणकर म्हणाले. नोकऱ्या विकून भाजप सरकार राज्यातील युवा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांशी खेळले आहेत असे ते म्हणाले.

आयआरबी जवान अनिल बांदेकर जे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा विभागमध्ये काम करत आहेत, त्याची नियुक्ती पोलिसउप निरीक्षक पदी केलेली आहे जो शारीरिक परीक्षेतनपास झाला होता आणि  लेखी चाचणीत १०० पैकी ९८ गूण त्याला मिळाले होते. आणखीन एक उदाहरण देताना ते म्हणाले की आदित्य मुकुंद गाड हा उमेदवार १८ नोव्हेंबर २०२१ रोजी शारीरिक चाचणी परीक्षेत नापास झाला होता, तरीही त्याला लेखी परीक्षेस बसण्याची संधी दिली आणि १०० पैकी ९८ गूण घेवून तो पास झाला. अशी कित्येक उदाहरणे त्यांनी दिली आहेत.

विधानसभा निवडणूकीचा निकाल १० मार्च २०२२ रोजी असल्याने, आचारसंहिता लागू आहे. तरिही ग्रह खात्याने नोकर भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्याचे  प्रयत्न सुरु केले आहेत असे चोडणकर म्हणाले. आचारसंहिता लागू असताना ही प्रक्रिया पुर्ण होण्यास देवू नये असे ते म्हणाले.  ही प्रक्रिया थांबवली नाही तर उच्च न्यायालयात आव्हान देणार असे चोडणकर म्हणाले.