मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याला खाप पंचायतीने केला विरोध

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावावर रविवारी खाप पंचायतीत चर्चा झाली. शासनाच्या या निर्णयाला खाप पंचायतीचे सदस्य अनुकूल दिसले नाहीत. खाप पंचायतीमध्ये मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला विरोध करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी खाप पंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकट हेही उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र या प्रस्तावाला खाप पंचायतीत कडाडून विरोध करण्यात आला. मुलींनी कोणत्या वयात लग्न करायचे, हे मुलीच्या पालकांवर सोडले पाहिजे, असे खाप पंचायतीचे म्हणणे आहे.

दरम्यान, यावेळी  खाप पंचायतीत उपस्थित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सांगितले की, 15 जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. दिल्लीच्या सीमेवर 13 महिने चाललेले हे आंदोलन म्हणजे शेतकर्यांचे प्रशिक्षण होते. ते म्हणाले की, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जानेवारी आणि जूनमध्ये आंदोलन कसे करायचे, हे आम्हाला आता कळले आहे.