कायरन पोलार्डचं ‘मुंबईप्रेम’! आयपीएलमधून निवृत्त होताना म्हणाला, MI कडून नाही तर MI विरुद्धही नाही

Kieron Pollard Retirement: मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स संघाचा स्टार अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल १२ वर्षे मुंबई संघाकडून आयपीएल खेळल्यानंतर अखेर थांबण्याचा निर्णय घेताना पोलार्डचे हृदय भरून आले. यावेळी ‘जर मी मुंबईकडून खेळू शकत नाही, तर मी स्वत:ला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही’, अशा शब्दांत त्याने मुंबई संघाप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजच्या या दिग्गज अष्टपैलूला मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई संघाने रिलीज केल्याचे वृत्त आले होते. १२ वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर संघाने पोलार्डला रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर मंगळवारी दुपारी अचानक निवृत्तीची घोषणा करत पोलार्डने आयपीएलप्रेमींना चकित केले आहे. आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये पोलार्डने लिहिले आहे की, त्याला आणखी काही वर्षे मुंबई संघाकडून खेळायचे होते. परंतु मुंबई संघासोबत बातचीत झाल्यानंतर त्याने आयपीएलला अलविदा (Kieron Pollard Retirement) करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलार्डने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंबई इंडियन्सला बदलाची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकत नाही, तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबईचा खेळाडू राहणार आहे.’

आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई संघाचा (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.