लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली; कांदोळकरांचा गौप्यस्फोट

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गोव्यातील राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. नेत्यांच्या पक्षांतराचे सत्र अद्यापही सुरू आहे. माजी मंत्री मायकल लोबो आणि पत्नी दिलायला लोबो यांच्या पक्षांतरच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजपवर नाराज होऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. इथूनच कॉंग्रेसमध्ये धूसपूस सुरू झाली.

यादरम्यान,  TMCचे  नेते किरण कांदोळकर यांनी लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली असल्याचा आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकीकडे आरोपांचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे लोबोंना कॉंग्रेसने प्रवेश स्वीकारल्यामुळे आधीचे कॉंग्रेसवासी नाराज झाले आणि कॉंग्रेसमधल्या लोकांचे राजीनामा सत्र सुरू झाले. त्यामुळे, निवडणूकीआधीच पक्षात मोठे फटाके फुटताना दिसून येत आहेत.

ते म्हणाले की, ‘गोव्यात मोठ्या प्रमाणात भंडारी समाज वसलेला आहे. मायकल बोलो हे गोव्यातील जनतेसाठी हानिकारक ठरू शकतात. ते गोव्यातील भंडारी समाजाला नष्ट करून संपवण्याच्या मोहिमेवर आहेत. त्यामुळे गोव्यातील जनतेसमोर टीमसीला मतदान करणे हाच एकमेव पर्याय आहे. अशा लोकाना राजकारणातून धुडकावून लावणे गरजेचे आहे.’ त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस आणि भंडारी समाजाला संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोपही कांदोळकर यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भंडारी समाजातील लोकांची मते लोबोंविरुद्ध जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेते आपला पक्ष कसा सर्वश्रेष्ठ आणि समोरचा पक्ष कसा निकामी, अशी स्पर्धाच जणू रंगली असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान, तृणमूल कॉंग्रेसने आपल्या AITC या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर करत मायकल लोबो हे गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये लोबोंवर आरोप करणारी जनता आणि काही राजकीय पुढारी दिसत आहेत. लोबोंच्या काही गुन्ह्यांबद्दल उघडपणे बोलले आणि द्वेष व्यक्त केला जात आहे. ‘मायकल लोबो हे त्यांच्या भ्रष्ट कारवायांसाठी ओळखले जातात आणि तरीही ते कळंगुटमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेसने गुन्हेगारांना आश्रय आणि तिकिटे देण्यास सुरुवात केली आहे? अशी चर्चा रंगू लागली आहे.