‘तुकोबारायांची पालखी सजवायचं काम मुस्लीम बांधव करत आहेत, पण..’, किरण मानेंची सणसणीत पोस्ट

Pune – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची (Kolhapur ) हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. कोल्हापूरपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान येथेही धर्मद्वेषी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला गेला.

अशाप्रकारे रोज कुठे ना कुठे नवा हिंदू मुस्लिम वाद समोर येत असताना मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी एक सणसणीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी धर्मातील तेढ मिटवण्याचा संदेश दिला आहे.

पंढरीच्या वारीतील तुकाराम महाराजांच्या पालखीचे उदाहरण देऊन अत्यंत सडेतोड आणि कान टोचणारी पोस्ट शेयर किरण माने यांनी केली आहे. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक वर्षानुवर्षे वारीतून चालत आलं आहे याचं उत्तम प्रमाण किरण माने यांनी दिलं आहे.

किरण माने यांनी लिहिले आहे की, ‘तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी !’
‘देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत…’

‘तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हननं हाय.’

पुढेकिरण माने म्हणतात, ‘रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो.’

‘आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय !’ अशी पोस्ट शेयर करत किरण माने भरकटत चाललेल्या समाजाला आपल्याच संस्कृतीची आठवण करून दिली आहे.