किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे; संजय राऊत यांचा आरोप 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.  यातच खासदार संजय राऊत (sanjay raut)  आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somayya) यांच्यामध्ये देखील चांगलेच द्वंद्व सुरु आहे. मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचावी म्हणून जमा केलेल्या निधीवरून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत हे आरोप करत असल्याचे चित्र असून आज पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्या यांना डिवचले आहे.

किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,  सोमय्यांच्या बाजूने खोटे पुरावे तयार केले जात असून, यात राजभवनाने पडू नये, असा इशारा राऊतांनी दिला आहे.विक्रांतच्या (INS Vikrant) नावावर घोटाळा झाला आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पैसे गोळा केले गेले. किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांची एक माफिया गँग जी बिल्डरांकडून पैसे गोळा करते. पूर्ण राज्यात आणि राज्याबाहेरही सेव्ह विक्रांतच्या नावावर पैसे गोळा केले गेले. पैशांचा गैरवापर झालेला आहे. हे पूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्याचा तपास होईल.

कालपासून किरीट सेनेची काही माणसं राजभवनामध्ये जात आहेत. जुन्या तारखेनं काही कागदपत्र तयार करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची मला माहिती मिळाली आहे. राजभवनाने या भानगडीत पडू नये. राजभवनाने या देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये, एवढंच सांगू इच्छितो. हा घोटाळा मोठा आहे. किरीट सोमय्या यांच्या अनेक भानगडी लवकरच बाहेर येणार आहेत, असा इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला.