किरीट सोमय्या यांना राज्यातच नव्हे तर देशातही राहण्याचा अधिकार नाही – शिवसेना

सोलापूर – महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून त्यांना नामोहरम करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या (kirit somayya) आता स्वतः घोटाळ्याप्रकरणी उघडे पडले आहेत .आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे या मागणीसाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पार्क चौक येथील शिवसेनेच्या (shivsena) कार्यालयासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर प्रतीकात्मक हाथोडा मारून सोमय्यांचे तोंड फोडो आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले .

भ्रष्ट सोमय्या हाय हाय,सोमय्यांच्या भ्रष्टाचाराने भाजपचा बुरखा फाडला,निषेध असो निषेध असो,किरीट सोमय्यांचा निषेध असो,सोमय्या मुर्दाबाद, ईडीचा राडा, सोमय्यांना गाडा, भ्रष्ट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी झालीच पाहिजे, देशाची सुरक्षा सोमय्यांकडून वेशीवर, शिवसेना झिंदाबाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

२०१३ सालामध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यासाठी असमर्थता दाखविल्यानंतर सोमय्या पुढे आले आणि त्यांनी त्यासाठी रेल्वे स्थानक तसेच विमानतळावर डबे घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला .आयएनएस विक्रांत ही देशाची शान असल्यामुळे या भावनेपोटी सामान्यातील सामान्य माणसांनी सढळ हाताने मदत केली. इतकेच नव्हे तर नौदलाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा यासाठी हजारो रुपये दिले. मात्र जमा झालेला हा कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचलाच नाही. या गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांचे सोमय्या यांनी काय काय केले ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर माहितीच्या अधिकारात मिळालेली धक्‍कादायक माहिती देशासाठी चिंतेची बाब बनली आहे.किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचलाच नाही आणि दुसऱ्याचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणण्याचे नाटक करणाऱ्या सोमय्या यांचे पितळ उघडे पडले .सोमय्या यांनी १०० कोटींचा घोटाळा करून सामान्य जनतेने आयएनएस विक्रांत (INSVikrant) युद्धनौका वाचविण्यासाठी दिलेल्या पैशातून स्वतःच्या बांधकाम व्यवसाय व निवडणूक खर्चासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केला आहे .

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे स्मारक तयार करण्यासाठी राजभवन येथे निधी जमा करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि तो स्वतः वापरल्याचा संशय असून अशा देशद्रोही कृत्यामुळे किरीट सोमय्याला राज्यातच नव्हे तर देशातही राहण्याचा अधिकार नाही .त्यांची जागा तुरुंगातच असली पाहिजे, अशी मागणी करत किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या कोट्यावधी निधीचे काय केले ? याचे उत्तर महाराष्ट्रातील तमाम जनता भाजपकडून मागत आहे .किरीट सोमय्या स्वतः उघडे पडले असल्यामुळे भाजपचा ना खाउंगा ना खाने दुंगा चा बुरखा पुरता फाटला गेला आहे .स्वतः प्रामाणिक असल्याचा आव आणून दुसऱ्याच्या घरावर हाथोडा मारण्याचे नाटक करून प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट करणारे किरीट सोमय्या आता स्वतः च भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. किरीट सोमय्या यांची बडबड बंद करण्यासाठी अखेर सोलापूर शिवसेनेला त्यांच्या तोंडावर हाथोडा मारून भ्रष्टाचाराला मुठमाती देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.