हिसाब तो देना पडेगा; किरीट सोमय्या यांचा दांडपट्टा सुरूच

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना इडीचे समन्स आले आहे. उद्या 11 वाजता चौकशी साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. पत्रावाला चाळ जमीन घोटाळा (Patrawala Chaal land scam) प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, अजून अशी नोटीस मिळाली नाही असं राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! असं राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी प्रहार केला आहे.  सोमय्या यांनी थेट ‘हिसाब तो देना पडेगा’ म्हणत केलेल्या घोटाळ्या प्रकरणी कारवाईला तर सामोरे जावेच लागणार असल्याचे म्हणले आहे. एवढेच नाहीतर तुम्ही मला, पत्नीला, मुलगा नीलला आणि आईला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या पण आता ‘हिसाब तो देना पडेगा ‘ अशा आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. मध्यंतरी संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद टोकाला गेला होता. त्यानुसार आता संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावून मंगळवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत असतानाच राऊतांना मात्र वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागणार आहे.