ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचा गेल्या वर्षभरात पर्दाफाश केला – किरीट सोमैया  

मुंबई – ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांचा तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा गेल्या वर्षभरात आपण पर्दाफाश केला असून यापुढील काळातही या सरकारमधील काही मंत्र्यांचा व सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचे घोटाळे उजेडात येतील, असा दावा भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी शनिवारी केली. प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या बेकायदा बंगल्याचे प्रकरणही आपण उजेडात आणल्याचे डॉ. सोमैया यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित १०५० कोटींच्या बेनामी मालमत्तेची चौकशी सुरु आहे. या संदर्भात सत्य लवकरच उजेडात येईल. ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची विविध यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मुश्रीफ यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल असेही डॉ. सोमैया यांनी नमूद केले.

डॉ. सोमैया यांनी सांगितले की, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आदी शिवसेना नेत्यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे चौकशी सुरु आहे. मिलिंद नार्वेकर यांनी त्यांनी अलिबाग येथे केलेले बंगल्याचे अवैध बांधकाम स्वतःहून पाडून टाकले आहे. उद्धव ठाकरे व रवींद्र वायकर यांच्या बंगल्यांच्या कामाबाबतही आपण तक्रार केली होती.

परिवहन मंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टची राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून चौकशी सुरु आहे. परब यांच्या रिसॉर्टवर ५. ४२ कोटी इतका खर्च झाला असून हे रिसॉर्ट बेनामी असल्याची कबुली परब यांच्या सीए ने दिल्याचेही सोमैया यांनी सांगितले.