केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीला मुकणार ? वनडे आणि टी-२० मधूनही बाहेर पडण्याची शक्यता

बंगरूळ – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी-20 मालिकेसाठी केएल राहुलकडे (K.L.Rahul) कर्णधारपद मिळाले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण मांडीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला असून ऋषभ पंत (Rishabh Pant) संघाचे नेतृत्व करत आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.

राहुल सध्या एनसीएमध्ये रिहॅब करत असून त्याच्या दुखापतीबाबत मोठ्या बातम्या येत आहेत. त्याची दुखापत (Injury) अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. अशा स्थितीत तो इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून होणाऱ्या एकमेव कसोटीतून बाहेर राहू शकतो. याशिवाय एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.

क्रिकबझच्या बातमीनुसार, राहुल कधी मैदानात उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी तो एनसीएमध्ये (NCM) पोहोचल्याचे समजते आणि त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. इंग्लंड मालिकेतील त्याचे खेळणे संशयास्पद असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. पण त्याला पांढऱ्या चेंडूंची मालिकाही वगळावी लागेल की नाही हे स्पष्ट झाले नाही.

भारतीय संघाचा पहिला गट १६ जूनला इंग्लंडला (England) रवाना होणार असल्याची माहिती आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यासह दुसरा गट 20 जूनला जाणार आहे. ते सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहेत.