जाणून घ्या महाविकास आघाडी सरकार विरोधातील मोहिम भाजप  फत्ते कशी करणार?  

Mumbai –  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे  सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकमेव उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असं राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

दरम्यान,  सुरूवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलेले हे आमदार आता गोव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपनेही सर्व आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणीदरम्यान कोणती रणनीती असेल याबाबत सर्व आमदारांना सुचना देण्यात येणार आहेत. सर्व आमदारांना हॉटेल प्रेसिडेंटमध्ये थांबवले जाणार आहे. तिथून हे सर्व आमदार विधानभवनात दाखल होणार असल्याचे समजते.

गोव्यात त्यांच्यासाठी ताज रिसॉर्ट 70 खोल्या बुक करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर हे आमदार गुरूवारी सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील, असं सांगितलं जात आहे. बंडखोर आमदारांविरोधात सुरू असलेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे ही दक्षता घेण्यात आल्याचे समजते.