सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादीची म्हात्रेंच्या विरोधात पोलिसात तक्रार

पुणे – नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे (Chief Minister Eknath Shinde’s son MP Shrikant Shinde) यांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला. त्यानंतर विरोधकांकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी ट्वीटरवर सुप्रिया सुळे यांचा एक फोटो पोस्ट केला त्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.

म्हात्रे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. तर, शेजारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बसलेले दिसत आहेत. दरम्यान, या फोटोमध्ये सुप्रिया सुळेंचा जो फोटो आहे तो आधीच्या एका कार्यक्रमामधील असून तो फोटो सुप्रिया सुळेंनी आधीच फेसबूकवर पोस्ट केला आहे. तोच फोटो एडिट करून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवल्याचं समोर आलं आहे.दरम्यान, शितल म्हात्रे यांचा समाचार राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी घेतला आहे.

यातच आता सुप्रिया सुळेंच्या खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची माजी नगरसेविकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये नुकतीच कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले.

त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब यांच्या कडे दिले.