विजय हजारे ट्रॉफीत सलग ५ शतके मारणाऱ्या जगदीशनला विकत घेण्यात सीएसके फेल, ‘या’ संघाने मारली बाजी

IPL Auction Live: आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या अनुभवी क्रिकेटर्सच्या लिलावानंतर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव झाला. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत नारायण जगदीशन (N Jagsdeesan) या नावावर अनेकांची नजर होती. गेले २ हंगाम एमएस धोनीच्या (MS Dhoni) हाताखाली तयार झालेल्या जगदीशनला यंदा मात्र चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केले होते. लिलावात त्याला विकत घेण्यासाठी सीएसके प्रयत्नशील दिसली. परंतु कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना मात दिली.(KS Bharat sold to Gujarat for 1.20 crore while KKR outbid CSK to buy N Jagadeesan).

यष्टिरक्षक फलंदाज नारायण जगदीशन गेल्या मोसमापर्यंत सीएसकेचा भाग होता. मात्र यंदा संघाने त्याला रीलिज केले आहे. त्यानंतर त्याची बॅट थांबण्याचे नाव घेत नाहीये. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या बॅटने सलग ५ सामन्यात शतके झळकावली. यात २७७ धावांच्या विक्रमी खेळीचाही समावेश आहे. त्यामुळे २७ वर्षीय तामिळनाडूच्या फलंदाजावर लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता होती. कोलकाता संघाने त्याला ९० लाख रुपयांना विकत घेतले आहे.

तसेच यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत याला गुजरात टायटन्सने १.२ कोटींसह संघात सहभागी केले आहे. जम्मू-काश्मीरचा विवरांत शर्मा याच्यावर सनरायझर्स हैदराबादने २.६० कोटींची मोठी बोली लावली आहे. विवरांतबरोबरच समर्थ व्यास (२० लाख), सनवीर सिंग (२० लाख) यांनाही हैदराबाद संघाने विकत घेतले. तसेच चेन्नई सुपर किंग्जही शेख रशिदला २० लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे गेली काही वर्षे आयपीएलमध्ये खेळलेला अनकॅप्ड खेळाडू प्रियम गर्ग मात्र अनसोल्ड राहिला.