पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान

करमाळा – पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाई अहवाल तयार करावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की गेले दोन दिवस करमाळा तालुक्याला मान्सून पुर्व पावसाचा फटका बसला आहे. अधिक प्रमाणात वाहणारे वारे व त्यानंतर झालेला पाऊस हा विशेषतः केळी या पिकाचे नुकसान करुन गेला आहे. या नैसर्गिक आपत्ती मुळे केळी जमिनदोस्त झाली आहे.सध्या देशात केळीस चांगला बाजारभाव असल्याने केळी उत्पादक आर्थिक फायदा होईल या आशेने पिकाची जोपासना करत होता. परंतू पावसाचा व जोरदार वादळामुळे शेतकऱ्यांचे हे पिक हातचे निघून जाते अशी स्थिती आहे.

करमाळा तालुक्यात केळीचे विक्रमी उत्पादन होत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुध्दा करमाळा तालुक्यातील केळीस मागणी आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली पाहिजे. प्रशासनाने महसुल व कृषी या विभागांना प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाण्याचे आदेश देऊन तुर्तास नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तरी तयार करावे असे आदेश द्यावेत.शासनाच्या वरीष्ठ पातळीवर आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होण्याची वाट पाहत न बसता एक नैसर्गिक आपत्ती म्हणून पंचनामे व नुकसान अहवाल तयार करावा अन्यथा शेतकरी अडचणीत सापडला जाईल. या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी म्हणून आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घालणार असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

तुर्तास माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडून तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून केळी नुकसान भरपाई पंचनामे त्वरित तयार करावेत अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली असून याच्या प्रति मुख्यमंत्री, कृषीमंत्री व महसुल मंत्री, जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.