राज्यात अवैध सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची शोध मोहीमेला प्रारंभ; बावनकुळेंच्या प्रश्नावर आरोग्य मंत्र्यांचे उत्तर 

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालय परिसरात अर्भकांची मानवी हाडे व कवट्या सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर लगेचच स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या वर्धा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, राज्यात अवैधरित्या गर्भपात केंद्राची मोठी शोध मोहीम राबविल्या जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आर्वी येथील घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला अन् नागपुरातही क्वेटा कॉलोनी भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाच अर्भक मिळाल्याने खळबळ उडाली. राज्यात अवैधरित्या गर्भपात केंद्रांचे प्रमाण वाढत असून, क्वेटा कॉलोनी आणि आर्वी घटनेच्या माध्यमातून ते अधोरेखित झाले असल्याचे विधान परिषदेत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आर्वीच्या घटनेत राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने काय कारवाई केली असा प्रश्न आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

राजेश टोपे म्हणाले, आर्वीच्या कदम नर्सिंग होम प्रकरणात सहा सदस्यांची अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधातला खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मुदतबाहय गोळया, ऑक्सीटोसीन इंजेक्शन, डेक्सा इंजेक्शन पोलिसांनी जप्त केलेले असून, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान यंत्र जप्त करण्यात आले आहे. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्राची तपासणी करण्याबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे.