ठाणे – या भागात पवारसाहेबांच्या विचारांची नेहमीच पकड राहिली आहे. मात्र पक्षाने मोठे केलेले लोक आज सत्तेसाठी पक्ष सोडून गेले, जे सोडून गेले त्यांच्याबाबत चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी मी नाही असे सांगतानाच उलटपक्षी पुन्हा नव्याने बुरुज उभा करण्याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कोणीही पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला हवा अशी संघटनात्मक रचना आपण केली पाहिजे. बुथ कमिट्यांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवे. बुथ कमिट्या जर मजबूत असेल तर कोणीही आपला पराभव करू शकणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.२०१९ ला ज्यांच्या बुथ कमिट्या मजबूत होत्या त्यांना विजय मिळाला. थोड्याबहुत मतांच्या फरकाने जे पराभूत झाले त्यांचा पुढच्या वेळी विजय निश्चितच होणार अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
६०-७० वर्षात देशाने जे कमवले त्याला विकण्याचा रितसर कार्यक्रम केंद्रसरकारतर्फे केला जात आहे. जनतेचे शोषण सुरू आहे, याचे प्रबोधन लोकांमध्ये करायला हवे आणि हे करण्यासाठी आपल्याला सैन्य लागेल. ते सैन्य आपण उभे करूया आणि केंद्रसरकारचे अपयश घराघरात पोहोचवा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
आज तरुण कार्यकर्ते आपल्या सोबत उभे आहेत. याच तरुणाईच्या जोरावर आपण इथला निकाल पुढच्या काळात बदलून टाकू. ही कुस्ती आपणच जिंकू आणि विरोधकांना पार चितपट करू असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. ठाण्यातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकाही दिले पण याच लोकांनी ऐनवेळी धूम ठोकली. किसन कथोरे असतील, कपिल पाटील असतील यांना महत्त्वाची पदे दिली तरी पक्ष सोडून गेले. अशा लोकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी ही परिस्थिती बदलायची आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=-5evygBC4NY