मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती आहे.
लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास वाढला…
लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपाचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे.
राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचा कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसला. आता दुसरी पदयात्रा काढत असतील तर त्याचाही नक्कीच फायदा होईल. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेने इतिहास घडवला आहे. पदयात्रेत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच निवडणुकीतील मुद्दे आहेत.