बाळाला लसीच्या दोन्ही मात्रा देवूया, गोवर रुबेला हद्दपार करूया..!

पुणे – गोवर रुबेला हा आजार सन 2023 पर्यंत देशातून हद्दपार करण्याचे धोरण भारत सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठी सर्व पालकांमध्ये या आजाराविषयी, तसेच त्यापासून बचावासाठी बाळाला द्यावयाच्या गोवर रुबेला लसीच्या मात्रांबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने हा विशेष लेख…

काय आहे गोवर आजार (What is measles?) 

गोवर हा साथीचा आजार असून तो विषाणूपासून पसरतो. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो. अशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीच्या श्वसनसंस्थेतून शरीरात प्रवेश करतो. साधारणतः जानेवारी ते एप्रिल या कालावधीत गोवर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.

अशी आहेत गोवर आजाराची लक्षणे(Symptoms of measles) 

गोवरचा विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणतः सात ते दहा दिवसानंतर लक्षणे दिसून येतात. यामध्ये सुरुवातीला ताप येणे, सर्दी खोकला, डोळे लाल होणे यापैकी कोणतेही एक-दोन किंवा तीनही लक्षणे दिसून येतात. सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर दोन ते चार दिवसांनी कानाच्या मागे पुरळ येणे, नंतर चेहरा, छाती, पोट, पाठ व सर्व अंगावर पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

काय आणि कशी घ्याल काळजी

गोवर आजारची लक्षणे आढळून आल्यास बाळाला त्वरित जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु करावा. अशा बालकांची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण, गोवर झालेल्या बालकांमध्ये ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे ‘अ’ जीवनसत्वाचा डोस दिल्यास आजार आटोक्यात येतो. गोवर हा आजार मोठ्या पण होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांची आणि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

गोवरची लस कधी आणि कुठे घ्यायची (When and where to get the measles vaccine) 

बालकांना वयाच्या नऊ ते बारा महिन्याच्या कालावधीत गोवर रुबेला लसीचा पहिला डोस दिला जातो. तर वयाच्या 16 ते 24 महिने या कालावधीत गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस दिला जातो. याप्रमाणे सर्व बालकांनी गोवर रुबेला लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. गोवर रुबेला ही लस सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व रूग्णालयाकडून कार्यक्षेत्रात आयोजित नियमित लसीकरण सेवा सत्रांमध्ये मोफत दिली जाते. सर्व नवजात बालकांना त्यांच्या वयोगटानुसार शासकीय रुग्णालयामध्ये वेळच्या वेळी वेळापत्रकानुसार सर्व लस देऊन घेण्याबाबत पालकांनी जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी केले आहे.