माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील; मुंबईच्या महापौरांना पत्राद्वारे धमकी

मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. आता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. तसेच संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौरांना(mumbai mayor) शिवीगाळही झाली आहे.

माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आलं आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ते पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे. बाहेर वेगळं नाव आहे. पनवेल पोस्ट आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.

मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.