Mumbai – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Deputy CM Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
भाजपकडून (BJP) पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.
मंत्र्यांच्या शपथविधीनंतर (Oath Ceremony) आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, कुणाकडे कोणतं खातं जाणार याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, शंभुराज देसाई, गिरीश महाजन या मंत्र्यांनी खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच आहे आणि त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असं स्पष्ट केलंय.
असं असू शकते शिंदे-फडणवीस सरकारमधील संभाव्य खातेवाटप
विधी आणि न्याय – मंगलप्रभात लोढा, मुंबई, नगरविकास खाते – एकनाथ शिंदे, ठाणे, गृह आणि अर्थ – देवेंद्र फडणवीस, नागपूर, गृहनिर्माण – रवींद्र चव्हाण, ठाणे उद्योग – उदय सामंत, रत्नागिरी, पर्यटन आणि पर्यावरण – दीपक केसरकर, सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम – चंद्रकांत पाटील, पुणे, सामाजिक न्याय – सुरेश खाडे, सांगली,महसूल आणि सहकार – राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर,कृषी – दादा भुसे, नाशिक, पाणी पुरवठा – गुलाबराव पाटील, जळगाव, जलसंपदा – गिरीश महाजन, जळगाव, आदिवासी विकास – विजयकुमार गावित, नंदुरबार, अल्पसंख्याक विकास – अब्दुल सत्तार, औरंगाबाद, आरोग्य – अतुल सावे, औरंगाबाद, उच्च व तंत्रशिक्षण – तानाजी सावंत, उस्मानाबाद, ऊर्जा आणि वन – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर, ग्रामविकास – संजय राठोड, यवतमाळ, शंभूराजे देसाई, सातारा – ?,संदीपान भुमरे, औरंगाबाद – ?