दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांचा होणार पोपट, कारण… 

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार  हा छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतूनच तसे आदेश शिंदे-फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकते.

राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल. भाजपच्या महाराष्ट्रातल्या मिशन फोर्टी फाईव्हला लाभदायक ठरू शकतील अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदार राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच जी उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय.