‘काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले पाहिजे’

मुंबई : मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. याप्रसंगी वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून पुढे आले पाहिजे असे आवाहन कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या पाठीमागे दलितांचे संघटन उभे करा. काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले पाहिजे. त्यासाठी संघटन वाढवा आणि संघटन वाढवण्यासाठी संपर्क, समर्पण, संवाद, साधना, समन्वय या पाच घटकांवर भर द्या.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या, काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे, संविधान व लोकशाहीला माननारा पक्ष आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची भूमिका कायम घेतली आहे म्हणूनच सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी काँग्रेसमध्ये दिली जाते. कार्यकर्ता चांगले काम करत असेल, निष्ठावान असेल तर पक्ष त्याची नक्की दखल घेते त्याचेच उदाहरण सिद्धार्थ हत्तीअंबिरे आहे. काँग्रेसचा विचार, बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.