‘महाराष्ट्र सरकारने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची मानसिक अवस्था सरकारी खर्चातून तपासावी’

सांगली : 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत हा वाद उफाळला होता.त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत हा हल्ला सुनियोजित होता असा गंभीर आरोप केला आहे.

माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,भाजपा आमदार वेळोवेळी पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर आरोप करताना दिसत आहे. आज तर त्यांनी गंभीर आरोप पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर केला आहे.

मध्यंतरी आटपाडी येथे त्यांची वैयत्तिक भांडणे झाली होती त्यानंतर फडणवीसजी यांनी पडळकर यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे सुरक्षा दया अशी मागणी केली. परंतु राज्य सरकारने सुरक्षा दिली असताना ती नाकारून उलट पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पडळकर यांची मानसिक अवस्था ढासळळ्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारला मागणी करत आहे तात्काळ भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची मानसिक अवस्था सरकारी खर्चातून तपासावी अशी मागणी खरात यांनी केली आहे.