कुणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र स्थिर; यशोमती ठाकूर यांचा विरोधकांना सणसणीत टोला

अमरावती : कुणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र ( Maharashtra ) स्थिर राहणार असे ठणकावून सांगत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Add. Yashomati Thakur ) यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आज अमरावतीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त अमरावतीमधील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar, ), क्रीडा मंत्री सुनील केदार ( Sunil Kedar ), संस्थेचे हर्षवर्धन देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण, प्रेक्षागृह आदीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.

ज्याशिक्षण संस्थेत मी शिक्षण घेतले, त्याच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याचं भाग्य मला लाभले याचे मला आज समाधान वाटते. आज बाबांची उणीव भासते असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब यांचे कार्य मला अजून सर्वदूर पोहचविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज व्यासपीठावर ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार हे आमचे एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत पवारसाहेब या वयातही अतिशय जोमाने आणि निष्ठेने काम करत आहेत. गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्रात विकासाचा रथ अव्याहतपणे ओढत आहेत, अशी स्तुतिसुमने यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी उधळली.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी अतिशय कष्टातून आणि लोकांच्या कल्याणासाठी उभारलेल्या या शिक्षण संस्थेमुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी शिकू शकले. शिक्षणाचा हा वसा हर्षवर्धन देशमुख यांनी अव्याहतपणे पुढे सुरु ठेवला असून अतिशय दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयातून दिले जात आहे, असे सांगत या महाविद्यालयासाठी आपण यापुढेही सातत्याने मदत करत राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.