मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला…; ‘या’ नेत्यांच्या नावांची आहे चर्चा 

मुंबईः राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

मागील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागलेल्या महत्त्वाच्या आमदारांची नाराजी यावेळी दूर होण्याची शक्यता आहे. आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे. यांच्यासह मंजुळा गावित, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम आदींच्या नावाचीही चर्चा आहे.शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा या तिघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर दुसरा विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र आता त्यालाही तीन महिनांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. उलटपक्षी हिवाळी अधिवेशनच काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे विस्ताराची लगबग सुरु झाल्याचं दिसतंय.