सत्तापालट होण्याचा आधी महाराष्ट्राचा मग झारखंड, राजस्थान आणि बंगालचा नंबर; भाजप नेत्याचा दावा  

कूचबिहार – महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या (Shiv sena) अनेक आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांनी सोमवारी दावा केला की, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress in West Bengal) नेतृत्वाखालील सरकारलाही असाच सामना करावा लागेल. त्यांनी दावा केला की, टीएमसी सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच पडेल.

शुभेंदू अधिकारी म्हणाले की, महाराष्ट्र पाठोपाठ बिगर-भाजप शासित राज्ये (Non-BJP ruled states) झारखंड (Jharkhand) आणि राजस्थान त्यानंतर बंगालचा क्रमांक लागतो. भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसकडून तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेले भाजप छावणी सत्ता मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

कूचबिहार (Cooch Bihar) जिल्ह्यातील एका रॅलीला संबोधित करताना अधिकारी म्हणाले, प्रथम महाराष्ट्रातील परिस्थिती सोडवायला हवी. यानंतर आता झारखंड आणि राजस्थानची (Rajasthan) पाळी आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल येईल. त्यांची (तृणमूल काँग्रेस)ही तीच अवस्था असेल. 2026 पर्यंत सरकार चालणार नाही. हे सरकार 2024 पर्यंत बाहेर पडेल.