मुंबई – महाविकास आघाडी सरकार सत्तेत येवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भाजपकडून ठाकरे सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु आहे. भाजपचे दिग्गज नेते हे राज्यभर पत्रकार परिषदा घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. काल मुंबईत खासदार हीना गावित यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना काळातील कामगिरीवरून राज्य सरकारवर हल्ला केला.
त्या म्हणाल्या, जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
कोरोनाकाळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरू होती. भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली व हजारो लोकांना नाहक प्राण गमवावे लागले. केंद्राकडून मिळणारी मदत लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यातही ठाकरे सरकारला अपयश आल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब जनतेस द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.
महाराष्ट्र सरकारने हिंमतीने #कोरोना महामारीचा सामना करुन महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण केले,हे महाराष्ट्राला माहीत आहे!
भाजपाने @BJP4Maharashtra महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त जनतेला मदत न करता केंद्र सरकारच्या #पीएम_केअर_फंडा ला मदत केली हे महाराष्ट्र विसरणार नाही!!@DrHeena_Gavit— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) November 25, 2021
दरम्यान, गावित यांनी केलेल्या आरोपांना आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने हिंमतीने कोरोना महामारीचा सामना करुन महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण केले,हे महाराष्ट्राला माहीत आहे! भाजपाने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त जनतेला मदत न करता केंद्र सरकारच्या पीएम केअरफंडा ला मदत केली हे महाराष्ट्र विसरणार नाही!! असं कायंदे यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=C5UJi3yGjzU