Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन, कोल्हापूरात होणार अंत्यसंस्कार

Mahatma Gandhi’s Grandson Death : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे नातू अरुण मणिलाल गांधी (Arun Gandhi) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापुरात निधन (Arun Gandhi Death) झाले. अरुण गांधी यांचा मुलगा तुषार गांधी यांनी मंगळवारी (०२ मे) ट्विट करून ही माहिती दिली. अरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आज कोल्हापुरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले आहे.

अरुण मणिलाल गांधी कोण आहेत?
अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला होता. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी नंतर आजोबांच्या मार्गाचा अवलंब केला आणि सामाजिक-राजकीय समस्यांवर कार्यकर्ता म्हणून काम केले.

अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी हे प्रमुख आहेत. अरुण गांधी १९८७ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली होती.