महाविकास आघाडीचे सरकार दोन कोटी महिलांना सक्षम करणार – यशोमती ठाकूर

मुंबई  : महाविकास आघाडीचे (MVA)शासन माविमच्या माध्यमातून २ कोटी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करीत असून, येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून २ कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असा विश्वास आज महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सह्याद्री अतिथिगृह, येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित  सन्मान प्रेरणादायी महिलांचा  या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा  ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(Kishori pednekar) , माविमच्या व्यावस्थामपकीय संचालक श्रद्धा जोशी आणि सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर समीर राऊत आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या ,महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलामध्ये उद्योगजकतेचा विकास व्हावा यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी महत्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत 1.50 लाख हजार बचतगटाची निर्मिती करुन 17.51 लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी जवळजवळ 8.50 लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी 80% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.