“वैचारिक दृष्ट्या ‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालेला आहे वाटतं”

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) हिचा विवाहसोहळा काल (29 नोव्हेंबर) संपन्न झाला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar Narvekar) यांच्यासोबत पूर्वशीने सात फेरे घेतले आहेत. या हायप्रोफाईल विवाह सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, दारू वरची एक्साईज ड्युटी 50% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची. असं म्हणत राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. ‘वैचारिक दृष्ट्या ‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालेला आहे वाटतं. कोणाच्याही बद्दल दोन्ही हातांनी बोंबलत बसण्या पलीकडे काही कर्तृत्व नाही.’ असा टोला मेहबूब शेख यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.

हे देखील पहा