गोव्यात चालणार ‘दादागिरी’ फडणवीसांच्या टीममध्ये महेशदादांची दणक्यात एंट्री

पणजी : देशात पाच राज्यांत निवडणूक जाहीर झाल्या आहेत. गोव्यात देखील १४ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या महासंग्रामासाठी भाजप काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर आप आणि तृणमूल काँग्रेसच्या जोराने भाजपचे टेन्शन वाढले आहे. अशात भाजपची गोवा विधानसभेची जबादारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर असल्याने ती समर्थपणे पार पाडण्यासाठी फडणवीसांनी एक मास्टरस्ट्रोक खेळाला आहे.

फडणवीसांनी गोवा काबीज करण्यासाठी आपली ‘टीम गोवा’ तयार केली असून त्यात आता भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना आता घेण्यात आले आहे. त्यांच्यावर म्हापसा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी मंत्री आणि मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय यांना देखील फडणवीस यांनी आपल्या गोवा टीममध्ये जागा दिली आहे. त्यांच्यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साकोली या मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आता आमदार लांडगे यांनाही या ‘गोवा टीम’ मध्ये घेण्यात आले असून, त्यांच्याकडे म्हापसा या महत्वाच्या मतदारसंघाची धूरा सोपविण्यात आली आहे.

म्हापसा मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला होता. माजी आमदार ख्रि. फ्रान्सिस डिसोझा यांनी १९९९ मध्ये गोवा राजीव काँग्रेस पार्टीच्या उमेदवारीवरून विजयी होत मगोच्या बालकिल्ल्याला खिंडार पाडले होते. त्यानंतर डिसोझा यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघातून विजयी होण्याचा विक्रम नोंदविला. २००२ पासून त्यांच्या रूपात भाजपला अल्पसंख्यांक ख्रिस्ती समाजाचा नेता मिळाला. सध्या त्यांचे पुत्र जोशुआ डिसोझा हे या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे २००२ पासून आतापर्यंत या मतदारसंघावर भाजपने पकड मजबूत केली आहे.

अशात महेश लांडगे यांच्यासाठी वरवर दिसताना ही निवडणूक सोपी दिसत असली तरी इच्छुकांच्या भाऊगर्दीत ही सीट निवडणून आणण्यासाठी त्यांच्या कौशल्याच्या कस लागणार आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आमदार लांडगे यांनी शुक्रवारी घेतला. तर, शनिवारी त्यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबरोबर त्याबाबत चर्चा केली. काल गोव्याला गेलेले आमदार लांडगे दोन दिवस तिथेच थांबणार आहेत. समन्वय बैठका घेणार आहेत. पुढील आठवड्यात पुन्हा गोव्याला जाणार असून दहा दिवस तळ ठोकून राहणार आहेत.

दरम्यान, २०१९ मध्ये ख्रि. डिसोझा उर्फ बाबुश यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे ओढवलेल्या पोटनिवडणुकीवर बाबुश समर्थक व भाजप नेते सुधीर कांदोळकर यांनी दावा केला, पण पक्षाने ख्रि. डिसोझा यांचा पुत्र जोशुआ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सुधीर कांदोळकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व निवडणूक लढविली. जोशुआ यांनी कांदोळकरांचा एक हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला व भाजपचा हा बालेकिल्ला शाबूत ठेवला. परंतु काँग्रेसने या मतदारसंघात १० हजारांपेक्षा जास्त मते मिळविण्याचा विक्रम केला. मगो पक्ष विरहीत १९८० मध्ये श्यामसुंदर नेवगी हे अर्स काँग्रेसवर तर १९९९ मध्ये फ्रान्सिस डिसोझा हे राजीव काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. गेल्या पोटनिवडणुकीत मगोने काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दर्शविला होता.