महेश मांजरेकरांचा मुलगा प्रेमात? सत्याने तिच्यासोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सत्या त्याचे वडिल महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात एका मावळ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांनी सत्याला मावळ्याच्या भूमिकेत पसंती दिलेली नाही आणि याचमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशातच चाहत्यांना सत्याच्या खासगी जीवनाबद्दल एक गोष्ट हाती लागली आहे, ज्यामुळे तो रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सत्याने काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. या फोटोतील मुलगी सत्याला मिठी मारताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सत्याने ‘Forever And Always’, असे लिहिले होते. ज्यामुळे चाहत्यांना सत्या या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे वाटले. या मुलीचे नाव श्रुतिका शिंदे असे असून सत्याने यापूर्वीही तिच्यासोबतचे बरेचसे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सत्यानं शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला दोघांना एकत्र पाहून मला आनंद झाला.’ यावर उत्तर देत सत्या म्हणाला, ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस का?’ नेटकऱ्याच्या या प्रश्नावर देखील सत्यानं उत्तर दिलं आहे. सत्या म्हणाला, ‘ती माझी चांगली मैत्रिण आहे.’ यानंतर सत्याच्या रिलेशनशीपच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान, सत्यानं बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘आई’ या चित्रपटात तो दिसला होता. यानंतर सत्यानं ‘जाणिवा’, ‘पोरबाजार’ या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय सत्यानं ‘फन अनलिमिटेड’, ‘1962 द वॉर इन द हिल्स’ आणि ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.