एकनाथ शिंदेचा पुतण्या असल्याचं खोटं सांगत फिरणाऱ्या महेश शिंदेला जुगार खेळताना अटक

भाईंदर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना जुगार खेळताना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. पण अटक करण्यात आलेली व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती देत, महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. महेश शिंदे यांना काल रात्री गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काशीमीराच्या हटकेश संकुलातून जीसीसी क्लबमध्ये जुगार खेळताना ताब्यात घेतले. महेश शिंदे स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे सांगतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. महेश शिंदेसह चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे आणि महेश शिंदे यांच्या आडनावातील साधर्म्यामुळे महेश हा स्वतःला एकनाथ शिंदे यांचा पुतण्या असल्याची बतावणी करत होता. पण अखेर पोलिसांनी त्याचा  पर्दाफाश केला आहे. पोलीस तपासात महेश शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय.