सत्तेच्या लालसापोटी बंड करणाऱ्यांनी शहीद हा शब्द वापरू नये; राष्ट्रवादीची टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेली असताना भाषणाच्या ओघात असे बोलले की बंड फसला असता तर शहीद होण्याची पाळी होती. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase)  यांनी घेतला.

तपासे म्हणाले वास्तविक शहीद ही उपमा कोणाला देतात हे कदाचित सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहीत नसावं. लष्करातील जवान जेव्हा देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देतात, देशाच्या दुश्मनांसमोर शरणागती न पत्करता सर्वोच्च बलिदान करतात अशांना शहीद म्हटलं जातं. भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला व हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली ते शहीद असतात.

याशिवाय देशात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना पिटाळून लावत असताना त्यांच्या प्रति हल्ल्यात झालेल्या गोळीबाराचा सामना करत असताना वीरगती प्राप्त झालेले आमचे पोलीस बांधव हे शहीद परंतु सत्तेसाठी बंड करायचा व ज्या घराने आपल्याला आसरा दिला, नाव दिले, मोठे केले, अशाच घराला फोडणारे कधीच कोणाच्याही समोर आदर्श होऊ शकत नाही असा टोमणा महेश तपासे यांनी लगावला. त्यांचा बंड यशस्वी ठरो किंवा अपयशी ठरो, इतिहास त्यांना काय म्हणेल हे महाराष्ट्राला माहीतच आहे अशी तीव्र प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.