मोदींनी स्वतः ची प्रतिमा तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले मात्र रेल्वे सुरक्षेवरील कॅगच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले?

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपली प्रतिमा तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले मात्र रेल्वे सुरक्षेसंदर्भात कॅगने दिलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ओडिशातील रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) तीनशे लोकांना आपला जीव गमवावा लागला असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

कॅगने आपल्या अहवालात रेल्वे सुरक्षा, ऑडिट आणि तपासणीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. अशी गंभीर निरीक्षणे नोंदवली गेली असताना कॅगच्या अहवालाकडे का दुर्लक्ष केले गेले, हे भाजप सरकारने जनतेला सांगावे असे आव्हानही महेश तपासे यांनी दिले आहे.

मोदींच्या कुशासनात गेल्या ९ वर्षात रेल्वे रुळावरून घसरणे, अपघात, जखमी आणि मृत्यूच्या विक्रमी घटना घडल्या आहेत असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे. रेल्वे मंत्रालयाने अहवालावर तात्काळ कारवाई केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.