‘महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पवारसाहेबांनी जी मेहनत घेतली याची राज ठाकरेंना काय माहिती ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि जातीयवाद असं नवीन विष पेरण्याचे कारस्थान राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु झाले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (mahesh tapase) यांनी केला आहे. दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या या वक्तव्याबाबत महेश तपासे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मंडल आयोगाची (Mandal Commission) अंमलबजावणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार असो की पवारसाहेबांनी केलेली बहुजनांच्यासाठीची कामे राज ठाकरेंना माहित नाही का? महाराष्ट्रात मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट या देशात पहिल्यांदा शरद पवार यांनी केले याची माहिती नाही का? असा थेट सवालही महेश तपासे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

शरद पवारसाहेबांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही हे राज ठाकरे यांचे वाक्य अतिशय हास्यास्पद आहे. शाहू – फुले – आंबेडकर आमचे सामाजिक दैवत होते आहे आणि राहतील असे सांगतानाच शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेणे चूक आहे का? हे राज ठाकरे यांनी मला सांगावे असेही महेश तपासे म्हणाले. बारा बलुतेदार, अठरापगड जातीचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी गेल्या ५०-५५ वर्षं अविरत पवारसाहेबांनी जी मेहनत घेतली याची राज ठाकरेंना काय माहिती असा प्रश्नही उपस्थित केला.

पवारसाहेबांचे कृषी धोरण, औद्योगिक धोरण, महिलांविषयीचे धोरण, युवकांविषयीचे धोरण, मागासवर्गीय समाजातल्या गोरगरीब समाजातल्या लोकांचे कल्याण होऊ शकलं आणि ते सरकारी योजनांमध्ये त्यांचा समावेश करून त्यांना स्वावलंबी बनविण्यामध्ये पवारसाहेबांचा मोठा हात आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजाचे पारंपरिक व्यवसाय पवारसाहेबांच्या नितीमुळेच बंद होऊ शकले आणि आज मागासवर्गीयांची मुले डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा उच्चभ्रू पदावर कार्यरत आहेत याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली.

पवारसाहेब कदाचित मंदिरात फार जात नसतील परंतु राज्यातील व देशातील जनतेलाच दैवत म्हणून सदैव त्यांच्या सेवेच्या रुपाने पूजन करून त्यांचा विकासरुपी आशीर्वाद हा महाराष्ट्राला पवारसाहेबांनी प्राप्त करून दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले. आंबेडकर जयंतीला एक दिवस बाकी असतानासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या साध्या शुभेच्छादेखील बहुजन वर्गाला राज ठाकरे देऊ शकले नाहीत याची खंत महेश तपासे यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंच्या आजच्या सभेचा रोख पूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस होता याचा अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात वाढत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.