Majhi Ladki Bahin Yojana, | राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, दरमहा आर्थिक लाभ देणारी योजना म्हणून तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी देखील ही योजना (Majhi Ladki Bahin Yojana,) महत्वाची आहे.
योजनेचे स्वरूप:
पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सक्षम बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १ हजार ५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
योजनेच्या लाभार्थी:
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये पेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही. १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे:
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वयासाठी व रहिवाससाठी – जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला , पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
लाभार्थी निवड:
ज्या लाभार्थ्यांस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामुल्य असेल. लाभार्थ्यांने स्वत: वरील ठिकाणी नमूद कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून लाभार्थ्याचा थेट फोटो काढणे व ई-केवायसी करता येईल. राज्य शासनाने या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवून ३१ ऑगस्ट केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे म्हणल्या, जिल्ह्यातील पात्र असलेल्या अधिकाधिक लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घावा. पात्र महिलांना ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप