हृदयद्रावक! प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू श्री गणेशन यांचे निधन, मंचावरच सोडला जीव

भुवनेश्वर : मलेशियातील आघाडीचे भरतनाट्यम गुरू श्री गणेशन (Bharatanatyam Guru Shri Ganesan) शुक्रवारी (09 जून) ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचत असताना स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना शहरातील जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित (Shri Ganesan Dies) केले. श्री गणेशन यांच्या अकनाक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.

श्री गणेशन हे मलेशियाचे नागरिक होते. ते क्वालालंपूर येथील श्री गणेशालयाचे संचालकही होते. गणेशन भुवनेश्वरमधील भांजा कला मंडपात तीन दिवसीय देवदासी नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमातही त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. शुक्रवारी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 60 वर्षीय श्री गणेशन यांनी नृत्य केले आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करत असताना ते स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कॅपिटल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की श्री गणेशन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा. शनिवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.