मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत.
यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. “ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपाला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही” असं त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे, असं सांगत कोणत्याही वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही, असं थोरात यांनी सुनावलं. ममता बॅनर्जी यूपीएच्या सदस्य नसल्याची आठवणही एबीपी माझा सोबत बोलताना थोरातांनी करून दिली.