Mallikarjun Kharge | काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्र हीच भाषा वापरतात आणि अब की बार ४०० पार चा नारा देतात. देशातील चित्र बदलले आहे अब की ४०० पार नव्हे तर भाजपाला देशभरातून ४० जागाही मिळणे अवघड आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे.
इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धुळे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत खर्गे बोलत होते. भाजपा व मोदी सरकारचा समाचार घेत ते पुढे म्हणाले की, भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी यांना ४०० जागांचे बहुमत मिळवून संविधान संपवायचे आहे. २०१५ मध्येच संविधान बदलण्याची जाहीर भाषा करण्यात आली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षणाची समिक्षा करण्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आताही भाजपा खासदार संविधान बदलणार असल्याचे बोलत आहेत. संविधान बदलले तर दलित, मागास, गोरगरिब लोकांचे आरक्षण व मुलभूत हक्क हिरावून घेतल जाणार आहेत. संविधानाचे रक्षण केले नाही तर जनतेचे नुकसान होणार आहे. भाजपाचा हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर भाजपाचा पराभव करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आणा असे आवाहन खर्गे यांनी केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप