Mallikarjun Kharge | नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे.
हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लीकार्जून खर्गे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करु अशा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजने अंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार. युपीए सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार गरिब लोकांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असेही खर्गे म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती भाजपाची आहे काँग्रेसची नाही आणि काँग्रेस असे काहीही करणार नाही.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप