मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी सोलापूरचे भूमिपुत्र मंगेश चिवटे

मुंबई: राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde)  यांनी आपल्या कार्यालयातील महत्वाच्या नेमणुका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे (Mangesh Chiwte) यांची निवड केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) काळामध्ये मंदावलेले कक्षाचे काम, पुन्हा एकदा गतीने सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

मुळचे सोलापूर (Solapur)  जिल्ह्यातील करमाळ्याचे असणारे मंगेश चिवटे यांनी अनेक वर्षे पत्रकारितेत काम केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांनीच पाठपुरावा केला होता. १३ मार्च २०१५ रोजी या कक्षाची स्थापना झाली होती. भाजप – शिवसेना युती काळामध्ये कक्षाच्या माध्यमातून तीन वर्षात २८ हजार रुग्णांना ३०२ कोटींची मदत केली, तसेच ४५० धर्मादाय रुग्णालयांच्या १० टक्के राखीव खाटांमधून ६०० कोटींचे उपचार करण्यात आले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाचे काम सुरु होते, मात्र अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ गरजू रुग्णांना होऊ शकला नाही. ठाकरे यांनी केवळ सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. तसेच १० गंभीर आजारांसाठी मदत करण्याची अट घालण्यात आल्याने मदतीसाठीच्या अर्ज संख्येत घट पहायला मिळाली.

मंगेश चिवटे हे सध्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो रुग्णांना मदत करण्यात आली आहे. कोल्हापूर सांगलीतील महापूर असो कि केरळमधील पूरस्थिती चिवटे यांच्या टीमने मदतकार्यात महत्वाची भूमिका निभावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.