पुणे | नुकतीच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospital) मध्ये यशस्वीपणे भारतीय वंशाच्या कॅनेडियन महिलेवर शस्त्रक्रिया करुन १३ किलो वजनाचा नॉन कॅन्सरस युटेराईन फायब्रॉईड काढण्यात आला. महिलेला रुग्णालयात आणले त्यावेळी सातत्याने होणारा रक्तस्त्राव, पाळीच्या वेळी दुखणे आणि पाठ पोटदुखी सारखी लक्षणे होती. तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की त्यांच्या गर्भाशयात फायब्रॉईड आहे, ही गाठ म्हणजे प्रसुतीच्या वेळी स्त्रीच्या पोटातील बाळा इतकी (३६ आठवड्यांच्या गरोदर काळा इतकी मोठी) होती, या महिलेची परिस्थिती पाहता मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospital), बाणेरचे कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकोलॉजी चे सर्जन तसेच एचओडी डॉ. बालाजी नलवाड आणि त्यांच्या चमूने टोटल लापारोस्कोपिक हिस्टेक्टोमी करुन त्यांच्या गर्भाशयातून हे फायब्रॉईड्स काढले.
गर्भाशयातील फायब्रॉईड्स म्हणजे बहुदा कॅन्सर नसलेल्या गाठी असतात त्या गर्भाशयाच्या भिंती किंवा गर्भाशयात निर्माण होतात. या फायब्रॉईड्सना लेयोमायोमा किंवा मायोमा असेही म्हणतात, याचा आकार वाढत जातो आणि लक्षणांमध्ये मासिक रक्तस्त्रावात होणारी वाढ, ओटीपोटात दुखणे आणि पोटावर किंवा आतड्यावर दाब येणे यांचा समावेश आहे. जर वेळेत उपचार केले गेले नाहीत तर त्याचा आकार आणि संख्या वाढू लागते. फायब्रॉईड्स आकाराने आणि संख्येने वाढू लागतात, परिणामी लक्षणे सुध्दा वाढू लागतात. प्रत्येक केस मध्ये उपचारांचे विविध पर्याय असून टोटल लापारोस्कोपिक हिस्टेरेक्टोनॉमी ही किमान जखम करणारी पध्दती असून यामुळे जटीलता कमीत कमी राहते, कमी वेळ हॉस्पिटल मध्ये रहावे लागते आणि ॲब्डॉमिनल हिस्टेरेक्टॉमी च्या तुलनेत रुग्ण लवकर बरा होतो.
या केस विषयी माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल, बाणेर ( पुणे) चे एचओडी आणि कन्सल्टंट ओब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. बालाजी नलवड यांनी सांगितले “ रुग्ण कॅनडात काही वैद्यकीय उपचार घेत होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. तिचे वजन हे ११५ किलो होते आणि तीनवेळा सिझेरियन केलेले असल्याने शस्त्रक्रियेच्या वेळी समस्या निर्माण होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्याच बरोबर हायपरथारॉडिझम, मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या आणि स्थूलता अशी विविध आव्हानेही होतीच. तिच्या गर्भाशयात मोठ्या आकाराचा युट्राईन फायब्रॉईड असल्यामुळे आम्ही टोटल लापरोस्कोपिक हिस्टेरेक्टोनॉमी करण्याचे ठरवले, यामध्ये ५ ते १० एमएम एवढ्या आकाराचे छोटे छिद्र पाडून कॅमेर्यासह विशेष उपकरणे वापरली जातात. अशा प्रक्रियांमध्ये परंपरागत ओपन सर्जरीच्या तुलनेत कमी धोका असतो.”
त्यांचा वैद्यकीय इतिहास पाहता आणि फायब्रॉईडचा आकार पाहता ही केस खूपच आव्हानात्मक होती, म्हणूनच लापारोस्कोपिक दृष्टिकोन हा खूपच सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय होता. या महिला रुग्णाला सर्जरी नंतर ७२ तासांनी घरी पाठवण्यात आले. आता सर्जरी नंतर तिच्या लक्षणात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप