सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर; भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेची सत्ता अखेर भाजपच्या ताब्यात गेलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अतुल काळसेकरांनी बाजी मारलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत 11 विरुद्ध 8 मतांनी दोघांचा विजय झाला असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय.

महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हिक्टर डॉन्टस यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक भरला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिलं.  ही प्रक्रिया जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात पार पडली. ही निवडणूक खूप चर्चेत आली होती. त्यामुळं जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

दरम्यान,  नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. या निवडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी भाजप अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे कोणाला संधी देतात ? याची उत्सुकता होती. त्यासाठी केंद्रीयमंत्री राणे यांनी बुधवारी सर्व संचालकांची बैठक घेतली होती.